वाशिम जिल्हा पोलिस सायबर जनजागृती कार्यक्रम .....
पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५ वाशिम जिल्हा पोलिस सायबर जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार जागतिक पातळीवर साजरा करण्यात येत असलेल्या सायबर जनजागृती महिना अंतर्गत आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे वाशिम जिल्हा पोलिस सायबर जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माननीय पोलीस महानिरीक्षक (IG) श्री. रामनाथ पोकळे, वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पोलीस पाटील आणि सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सायबर पोलीस स्टेशन, वाशिम यांनी नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सेवा उपक्रम राबविला. गहाळ व चोरीस गेलेले एकूण ११५ मोबाईल फोन शोधून त्यांच्या संबंधित मालकांना परत करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे ₹१७,२५,०००/- इतकी आहे. गेल्या वर्षभरात सायबर पोलीस स्टेशन, वाशिम यांनी एकूण ३६८ मोबाईल फोन परत मिळवून दिले असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹१,५५,२०,०००/- आहे. तसेच NCCR पोर्टलच्या माध्यमातून सायबर फसवणुकीत (ऑनलाइन फ्रॉड) नुकसान झालेल्या नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्यात आले. या नागरिकांचा सन्मान माननीय आयजी श्री. रामनाथ पोकळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सायबर पोलीस स्टेशन, वाशिम यांनी सोशल मीडिया मॉनिटरिंग कार्याची झलक व्हिडिओद्वारे उपस्थितांना दाखवली. नागरिकांना सोशल मीडिया फसवणुकीचे प्रकार, त्यांचे परिणाम आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वास्तव घटनांवर आधारित केस स्टडी आणि जनजागृतीपर सूचना यांद्वारे उपस्थित नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्यात आले. या कार्यक्रमात सायबर जनजागृती मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण माननीय आयजी साहेबांच्या हस्ते करण्यात आले. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन, वाशिम यांनी घेतलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय व अनुकरणीय ठरला असून, जिल्ह्यातील नागरिक व विविध संस्थांकडून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.